Monday, 30 November 2015

स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ या वर्षापासून राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
  • विमा कंपन्यांना विमा हप्त्याची रक्कम दिल्यापासून १२ महिने कालावधीसाठी शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
  • योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वर्षे वयोगटातील राज्यातील एक कोटी ३७ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
  • राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१५ रोजी समाप्त होत असल्याने ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • विमाधारक शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी तसेच अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी अशा तिन्ही प्रकारच्या जीवित हानीसाठी दोन लाख रूपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.
  • योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्याकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनाद्वारे भरण्यात येणार आहे.
  • मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची पत्नी, शेतकरी स्त्रीचा पती, अविवाहित मुलगी, आई, मुले, नातवंडे, विवाहित मुलगी या योजनेचे लाभ घेण्यासाठी वारसदार ठरणार आहेत.
  • शेती करताना होणारे अपघात, रेल्वे, रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसणे, वीज पडणे, खून, उंचावरुन पडून अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाण्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल, अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना राबविण्यात येईल.

Source: Gov. of Maharashtra

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights